ठाणे : सरकारकडून लसींचा मर्यादित साठा मिळत आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी लसीचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. लस न आल्यामुळे तब्बल सात तास रांगेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण न झाल्याने गोंधळ झाल्याचा प्रकार ठाण्यातील पोखरण नंबर २ येथील कृष्णाई हॉलसमोर घडला. शुक्रवारी १०० जणांची यादी काढूनही शनिवारी लस न मिळाल्यामुळे संतप्त नागरिकांनी तसेच मनसेने हॉल बाहेरच ठिय्या आंदोलन करत ठाणे महापालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
लसीचा तुटवडा आणि अतिवृष्टी यामुळे अनेक वेळा ठाण्यातील लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. जुलैमध्ये केवळ चार वेळाचा लसीचा पुरवठा झाल्यामुळे मर्यादित लोकांनाच लस घेणे शक्य झाले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने ठाणे शहरात लसीकरण केले जात आहे. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिकांची दुसऱ्या डोससाठीची मुदत संपत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी तासनतास लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत.
शहरात शनिवारी एकूण ३१ केंद्रावर लसीकरण केले जात होते. यामध्ये पाच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस दिला जात होता. मात्र, ठाण्यातील पोखरण रोड २ वरील कृष्णाई हॉल येथे होणाऱ्या लसीकरणासाठी १०० जणांची यादी शुक्रवारी रात्रीच करण्यात आली होती. यासाठी शनिवारी सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी ‘वॉक इन’ लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, सात तास झाल्यानंतर लस उपलब्ध नसल्याचे सांगत लसीकरण केंद्रावरून नागरिकांना घरी जाण्यास सांगण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी व मनसेने पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.
‘नियोजबद्ध मोहीम राबवा’
ठाणे महापालिकेने नियोजनानुसार आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केली आहे.
------------------