लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवारी ठाण्यातील सर्व दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोपरी-नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढलेल्या आदेशाने गोंधळ उडाला. त्यावर पोलिसांनी आक्षेप घेतल्याने महापालिका, पोलीस आणि व्यापाऱ्यांची पुन्हा एक बैठक झाली. त्यानंतर, यावर यशस्वी तोडगा काढून सुधारित आदेश काढण्याची नामुश्की महापालिकेवर ओढवली.
अनलॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काहीसा गोंधळ उडाला होता. पुस्तकांच्या दुकानांतून गर्दी झाल्याने ती बंद करण्यात आली. सुधारित आदेश काढल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी शनिवारपासून केली जाणार असल्यामुळे शुक्रवारी पहिल्याच दिवशी जांभळीनाकयावरील दुकाने बंद करण्यात आली.
कोर्टनाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने समविषम तारखांनुसार उघडण्यास परवानगी देण्याबरोबरच, येथील लहानमोठ्या गल्ल्यांचाही यामध्ये समावेश करणे अपेक्षित असताना तसे आदेशामध्ये नमूद नसल्याने शुक्रवारी दोन्ही बाजूंची काही दुकाने उघडी दिसल्याने पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सुधारित आदेश काढण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, महापालिकेने सुधारित आदेश काढले. गेले अडीच महिने ठाण्यातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अर्थकारण पूर्ण थांबले होते. शुक्रवारी दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी असली, तरी कोपरी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने या परिसरातील दुकाने समविषम तारखांना उघडण्याची परवानगी दिली होती.
मात्र, कोर्टनाका ते पुढे बाजारपेठेपर्यंत दोन्ही बाजूंनी दुकाने काही प्रमाणात उघडली होती, त्यामुळे महापालिकेचा आदेश गोंधळात टाकणारा आहे, असे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांचे म्हणणे होते. या आदेशामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे फार कठीण जाणार होते.दुपारनंतर दुकाने पुन्हा केली बंदसकाळी ११ च्या सुमारास महापालिका, पोलीस आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. त्यानंतर, महापालिकेने सुधारित आदेश काढला.त्यानुसार, रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सम तारखेस आणि रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने ही विषम तारखेलाच उघडावी, असे आता नमूद केले आहे.सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने आता उघडी राहणार आहेत. त्यानुसार, दुपारी येथील दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. त्यानंतर, आता शनिवारपासून येथील दुकाने सुरू होतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.