बदलापूर : बदलापूर शहरात रक्षाबंधनानिमित्त महिलांची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यासाठी होते. मात्र, या लसीकरण मोहिमेदरम्यान राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप पुन्हा दिसून आला. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या महिलांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.
बदलापूर नगरपालिकेने या मोहिमेंतर्गत दुबे रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय या दोन लसीकरण केंद्रांवर महिला विशेष लसीकरणाचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामध्ये दुबे रुग्णालयामध्ये ५०० तर ग्रामीण रुग्णालयात ४०० लसी उपलब्ध करून देण्यात आले होत्या. या आयोजित केलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात व्यवस्थित नाव नाेंदणीची प्रक्रिया करून मगच महिलांना आत लसीकरणासाठी सोडण्यात येत होते. मात्र, दुसरीकडे दुबे रुग्णालयात रांगेत उभे राहिलेल्या महिलांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दुबे रुग्णालयात लसीचा नेमका किती साठा उपलब्ध आहे हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे रांगेत उभ्या राहिलेल्या महिलांची मोठी गैरसोय झाली. यश मिळविण्यासाठी प्रत्येक महिला या ठिकाणी धडपडत असताना दिसली. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ महिलांची एकच गर्दी झाली होती. या गोंधळामुळे पालिका प्रशासन आणि सुरक्षारक्षकही हतबल झाले होते.