भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून बहुतांश आयारामांना उमेदवारी दिल्यावरून शिवसेनेतील नाराज बंडाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठांनी कंबर कसली असून नाराज सैनिकांची बैठक बोलवण्यात आली होती.शिवसेनेने एकूण २४ प्रभागांपैकी सातहून अधिक प्रभागांत केवळ आयारामांना संधी देत निम्म्याहून कमी निष्ठावंतांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून शिवसेनेत पक्षनिष्ठा राखणाºयांना डावलल्यामुळे पक्षात नाराजीचा सूर आळवला जाऊ लागला आहे. त्यातच पक्षात बाहेरून आलेल्यांपैकी काहींना महत्त्वाची जबाबदारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीच्या आदल्या रात्रीच भाजपात उमेदवारी न मिळालेल्यांनी सेनेत मात्र उमेदवारी मिळवली. त्याला नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत निष्ठावंतांचा पत्ता कट केला.कानामागून आला अन् तिखट झाला, या उक्तीप्रमाणे सेनेतील निष्ठावंतांची अवस्था झाली आहे. आयारामांच्या वाढत्या उद्रेकामुळे पक्षातील जुन्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी बैठका होऊ लागल्या आहेत. त्यात नाराज सैनिक आपल्या मनातील संतापाला वाट करून देत आहेत. यामुळे नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. नाराजांना शांत करण्यासाठी पक्षहित जोपासण्याचे साकडेही घातले जात आहे. प्रसंगी महत्त्वाच्या सैनिकाला सत्तेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले जात आहे.३० ते ३५ वर्षांपासून कार्य करणाºयांना डावलण्याचे प्रकार थेट पक्षप्रमुखांच्या कानी टाकण्याची धमकीही दिली जात आहे. नाराजांची मनधरणी करण्यासाठी मॅक्सस मॉल येथे बैठक बोलावली होती. आयारामांमधील काहींना थेट निष्ठावंतांच्याच डोक्यावर बसवल्याने त्यांचे नखरे सहन करणार नाही, असा इशारा नाराजांनी दिला आहे. निष्ठावंतांची नाराजी दूर करताना वरिष्ठ पदाधिकाºयांची दमछाक होणार हे निश्चित. पक्षात बंडाळी होऊ नये यासाठीही नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.
नाराजांना थंडोबा करण्यासाठी मनधरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:29 AM