उल्हासनगर : भाजपने ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसने भाजपविरोधात नेहरू चौकात आंदोलन केले. शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह शेकडोजण सहभागी झाले होते.
राज्यभर काँग्रेसने भाजपने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या कुटिल कारस्थानाविरोधात आंदोलन केले. शहर काँग्रेस पक्षाने नेहरू चौकात धरणे आंदोलन करून भाजपने बहुजनविरोधी भूमिका घेतल्याचा निषेध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती; परंतु केंद्र सरकारने व त्या वेळेस असलेल्या राज्यातील फडणवीस सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले, असा आरोप शहराध्यक्ष साळवे यांनी केला. केंद्र सरकारच्या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसने भाजप व मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली.
धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या पक्षाच्या प्रभारी राणी अगरवाल, साळवे, किशोर धडाके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनाला पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रमोद टाले यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे, माजी महापौर मालती करोतिया, किशोर धडके, आशेराम टाक, बाळू पगारे, दीपक सोनोने, अनिल सिन्हा, मनोहर मनुजा, कुलदीप माथारू, महेश मीरानी, शंकर अहुजा, आदी सहभागी झाले होते.