घाणेकर नाट्यगृहातील असुविधांबाबत काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:37 AM2019-07-24T00:37:38+5:302019-07-24T00:37:52+5:30
शनिवारी प्रयोग सुरु असताना उकाड्याने हैराण झालेल्या सिने तथा नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडियावर येथील समस्येचा पाढा वाचला
ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील असुविधांचा पाढा सिने अभिनेते भरत जाधव यांनी वाचल्यानंतर शिवसेना आणि भाजपने या नाट्यगृहाची पाहणी करुन सुविधा पुरविण्याची मागणी केली असून, मनसेनेसुध्दा यासंदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे वराती मागून घोडे निघाले आहे. मंगळवारी काँग्रेसच्या वतीने घाणेकर नाट्यगृहाबाहेर आंदोलन करण्यात आले.
शनिवारी प्रयोग सुरु असताना उकाड्याने हैराण झालेल्या सिने तथा नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडियावर येथील समस्येचा पाढा वाचला. त्यानंतर रविवारी शिवसेनेच्या वतीने सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली.
सोमवारी लागलीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या नाट्यगृहाची पाहणी केली. याच दिवशी मनसेने थेट महापालिका मुख्यालयात जाऊन घाणेकर नाट्यगृहाच्या असुविधांचा पाढा वाचला. त्यानुसार आता या नाट्यगृहाची पुन्हा एकदा डागडुजी सुरु झाली आहे. स्टेजवरील सिलिंगचीही दुरुस्ती सुरु झाली आहे. परंतु एवढे सगळे झाल्यानंतर मंगळवारी कॉंग्रेसने घाणेकर नाट्यगृहाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले. या आंदोलनात गटनेते विक्रांत चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
यापूर्वीच या नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यासाठी नाट्यगृह अनेक महिने बंद ठेवण्यात आले होते. परंतु त्यानंतरही नाट्यगृहाची अशी अवस्था झाल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे नाट्यगृहाची दुरुस्ती योग्य पध्दतीने झाली नाही, तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल. - मनोज शिंदे, शहर अध्यक्ष, काँग्रेस