------------
पाण्याचे डबके
डोंबिवली : शहरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात पाण्याचे डबके साचले आहे. त्याच ठिकाणी सुरक्षारक्षकांचे कार्यालय आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू अथवा मलेरियाची लागण कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
--------------------
दुचाकीला जीपची धडक
डोंबिवली : सागर्ली परिसरात राहणाऱ्या श्रुती कदम या १ जूनला रात्री ११ वाजता दुचाकीवरून आइस फॅक्टरी रोडने घरी जात असताना, त्यांच्या गाडीला भरधाव जीपची धडक बसली. यात श्रुती गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून महिला जीप चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------
मारहाण
कल्याण : अली पिरमोहमद शेख हे स्वत:चे घर विकत नाहीत, म्हणून त्यांना आणि त्यांचा भाऊ गुलाम या दोघांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली फिरोज सलीम शेख आणि अल्ताफ सलीम शेख यांच्याविरोधात दाखल तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मारहाणीची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता पत्रीपूल येथील श्रीकृष्णनगर परिसरात घडली.
------------------------------------------------
कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी कोरोनाच्या नवीन १३४ रुग्णांची भर पडली. १२३ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर २१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने, सध्या एक हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३४ हजार ७५ रुग्ण आढळून आले आहेत. दोन हजार १५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख ३० हजार २३५ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------------------------------------