मीरारोड - शांतीनगरमधील कलावती आईंच्या भक्तगणांना भाडे तत्वावर देण्यात आलेले समाजमंदिर रिकामे करून तोडणे, राहिवाशांची हक्काची मोकळी जागा कब्जा धारकास बहाल करण्यात सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाचे अभद्र संगनमत कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत यांनी केला आहे. त्यामुळेच महासभेत प्रश्न उपस्थित केला असता प्रश्नोत्तराचा तासच सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्याचे सावंत म्हणाले.
महानगरपालिकेच्या बुधवारी ऑनलाईन झालेल्या महासभेत शांतीनगर येथील आरजीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत कब्जा विषयी नगरसेवक अनिल सावंत यांनी महासभेत चर्चा होण्या साठी ९ जून रोजी प्रशासनाला प्रश्न विचारले होते. १५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने उत्तर दिले नाही. पालिकेने बांधलेले समाजमंदिर कलावती आई उपासना मंडळास दिले होते. पण पालिकेने त्यातील सामान पळवून नेले आणि समाजमंदिर जमीनदोस्त केले गेले. महापालिकेच्या ताब्यातील जागेवर ८ महिन्यांपासून अनधिकृत कब्जा झाला असताना सत्ताधारी भाजपा, महापौर, पालिका प्रशासन तक्रारी देऊन सुद्धा कारवाई करत नाही.
महासभेत प्रश्न आल्यावर सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी पुढाकार घेऊन महापौरांकडून प्रश्न उत्तरांचा तासच रद्द केला असा आरोप अनिल सावंत यांनी केला आहे. सदर जागा आरजी दाखवून विकासक शांती स्टारने बांधकाम परवानग्या मिळवल्या. त्या विकासकवर कारवाई करत नाही. पण जनतेच्या पैशातून बांधलेले समाजमंदिर तोडायला लावले, येथील राहिवाश्यांना इमारतींची जागा त्यांची नसल्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. या प्रकरणात दोषी असणाऱ्यां वर कारवाई साठी राज्य सरकार कडे तक्रार करू, प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू असे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले.