ठाणे : एक प्रभाग सदस्य पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी ठाणे महापालिकेने त्याचा कच्चा आराखडा एका महिन्यात तयार करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे; परंतु दुसरीकडे कॉंग्रेसने मागील महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना करताना तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवसेनेच्या बाजूने कौल असलेली प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रभाग रचना करताना ती पारदर्शक व्हावी आणि एक सदस्यीय किंवा दोन सदस्यीय पद्धतीने निवडणूक व्हावी, असे पत्र कॉंग्रेसचे प्रदेशचे महासचिव मनोज शिंदे यांनी महसुलीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवले आहे.
सध्याच्या एक सदस्यीय प्रभाग रचनेचे त्यांनी स्वागत केले आहे; परंतु ते करीत असताना २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचनेच्या मुद्यावरून त्यांनी थेट तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर निशाना साधला आहे. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेत असलेली चार सदस्यीय प्रभाग पद्धती प्रशासकीय कामकाजास आणि नागरिकांना त्रास देणारी आहे.
जयस्वाल यांना फडणवीस यांचे पाठबळ
त्यावेळी प्रभाग रचना शिवसेना पक्षाने तत्कालिन ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून त्यांना हवी तशी तयार करून घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी या पत्रात केला आहे. त्यावेळेस सर्व नियम, सर्व निकष पायदळी तुडवून ती ना तयार केली, तसेच प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच फुटलेली होती. याबद्दल राज्य निवडणूक आयोग आणि शासनाकडे तत्कालिन ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रारी दाखल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे; परंतु तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना असलेले पाठबळ म्हणून कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.