शिवसेना-राष्ट्रवादीच्या पोस्टरवर काँग्रेसचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:38 AM2020-08-31T01:38:38+5:302020-08-31T01:39:08+5:30
राज्यात महाआघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले आहे.
ठाणे - राज्यात महाआघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना व राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने घेतलेल्या निर्णयांच्या पोस्टर, बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचेही मोठे फोटो लावणे अपेक्षित आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी लावत असलेल्या पोस्टर, बॅनरवर फक्त पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचेच फोटो असतात. काँग्रेस नेत्यांचे फोटो लावले जात नसल्याबद्दल ठाणे शहराध्यक्ष विक्र ांत चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
शहरात पोस्टर, बॅनर, कटआऊटची स्पर्धा सुरू आहे. त्या विषयी पत्रकारांनी चव्हाण यांना बोलते केले असता, त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी या मित्रपक्षांवर टीका केली. राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांच्या सहमतीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात.
दरम्यान, नव्या वादाला तोंड फुटू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ठाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाच्या पोस्टर, बॅनरवर काँग्रेस नेत्यांच्या व्यतिरिक्त फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह या दोन मंत्र्यांचेच मोठे फोटो लावले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
यावरून राज्याच्या सत्तेतील या तिन्ही पक्षांमध्ये शहरात सुरू असलेल्या पोस्टर, बॅनरच्या स्पर्धेवरून आता वाद वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.