ठाणे : काही दिवसांपासून शहरात अनधिकृत बांधकामांवरून वादळ पेटले असतांना मंगळवारी झालेल्या महासभेतदेखील रात्री उशिरापर्यंत याच विषयावर लक्षवेधीद्वारे भाजप आणि काँग्रेसने प्रशासनाचे लक्ष वेधले. केवळ अनधिकृत इमारतीच नाहीत तर हॉस्पिटलमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींसह इतर अनधिकृत बांधकामांवरदेखील कारवाईची मागणी यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे आणि विक्रांत चव्हाण यांनी केली. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई ही केवळ राजकीय हेतूने केली जात असल्याचा आरोपही यावेळी डुंबरे यांनी केला. केवळ ठराविक भागातच कारवाई होत असून, इतर भागात कारवाईकडे कानाडोळा केला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत काँग्रेस आणि भाजपने ही लक्षवेधी मांडली होती. त्यावर मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. रात्री ९ वाजता यावर चर्चा सुरू झाली. तब्बल एक तास चर्चा झाली. कारवाई करतांना दिवा, खारेगाव, पुढे बाळकुम, कोलशेत अशा पद्धतीने ज्या ठिकाणी भुमिपुत्र आहेत, त्याठिकाणीच ही कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. इतर ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. केवळ अनधिकृत इमारतीच नसून, येऊरमधील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे, हॉस्पिटलमध्येदेखील अंतर्गत बांधकामे वाढली आहेत. हुक्का पार्लर, लॉज आदींसह इतर ठिकाणीदेखील अनधिकृत बांधकामे झालेली आहेत, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सहाय्यक आयुक्तांची केवळ बदली करून उपयोग नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.
यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार तक्रारी येत होत्या, त्यावरून प्रशासन आणि सत्ताधारी म्हणून आमचीदेखील बदनामी केली जात होती. येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे उत्तर द्यावे लागत होते. त्यामुळे ही कारवाई व्हावी म्हणून प्रशासनाला पावले उचलण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे चुकीची किंवा राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.