ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात केलेल्या नोटाबंदीमुळे गोरगरीब, सामान्य नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दोन महिन्यांनंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही. याकडे शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहरात सोमवारी काँग्रेसने थाळीनादासह घंटानाद केला. राष्ट्रवादीने पोतराजांच्या माध्यमातून चाबूक मारो आंदोलन छेडले. या दोन्ही पक्षांनी वेगवेगळे आंदोलन करून शिष्टमंडळ नेऊन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले. अ.भा. काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला. ५० दिवस कळ सोसा, त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही, तर मी हंटरने मार खाण्यास तयार आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. या वक्तव्याचा धागा पकडून राष्ट्रवादीने पोतराजांच्या साहाय्याने अंगावर चाबूक मारो आंदोलन केले. (प्रतिनिधी)
काँग्रेसचा घंटानाद, तर राष्ट्रवादीचे चाबूक मारो
By admin | Published: January 10, 2017 6:42 AM