कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा येथील काँग्रेसच्या वतीनेही शुक्रवारी अनोखे आंदोलन छेडून प्रतीकात्मक निषेध करण्यात आला. सरकारविरोधात संपूर्ण राज्यात शुक्रवारी आंदोलन छेडले असताना सरकारने जनतेला आतापर्यंत केवळ भूलथापा दिल्याचे सांगत स्थानिक पातळीवर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पकोडे तळले गेले आणि गाजरांचे वाटपही केले गेले.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. महागाई, अतिवृष्टी, आर्थिक मंदी, बँकेची दिवाळखोरी, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे, आर्थिक मंदी, आरोग्य, शिक्षण आदी समस्या दिवसेंदिवस तीव्र बनत चालल्याचे सांगत काँग्रेसतर्फेशुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने कल्याणच्या तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन झाले. तर, आंदोलनादरम्यान पकोडे तळण्यासह गाजरांचे वाटप करत सरकारचा निषेध केला. यावेळी पथनाट्याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारचा भोंगळ कारभार जनतेसमोर मांडण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, उपाध्यक्षा विमल ठक्कर, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, संतोष केणे, रवी पाटील, मनीष देसले, मुन्ना तिवारी, पॉली जेकब, शकील खान आदी सहभागी झाले होते. समस्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना शिवसेना-भाजप मात्र सत्तेसाठी भांडत असून त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे पोटे म्हणाले.