भिवंडी - भिवंडी काँग्रेसमधील बंडखोरी अजूनही सुरूच आहे. काँग्रेसचे महापालिका गटनेते हलीम अंसारी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू ,उपमहापौर इम्रान खान उपस्थित होते.
यावेळी अन्सारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा हलीम अन्सारी यांनीदेखील राष्ट्र्वादीत प्रवेश केला त्याच बरोबर समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते सगीर खान, शफिक शेख यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. नुकताच झालेल्या भिवंडी पालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी पक्षादेश बजावण्याचे आदेश देऊन ही त्याची अंमलबजावणी न केल्याने काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांची गटनेते व काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांनी केली असता ती हकालपट्टी होण्या पूर्वीच हलीम अन्सारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
पालिकेत बहुमत असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या गटनेता पदाची जबाबदारी हलीम अन्सारी यांच्यावर दिली होती , परंतु त्यांनी विश्वासघात केल्याने महापौर पदाच्या निवडणुकीबरोबरच नुकताच झालेल्या स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला या सर्व घटनांमागचा खरा चेहरा गटनेता हलीम अन्सारी हेच असल्याचे त्यांच्या पक्ष प्रवेशाने उघड झाले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे .खुद्द गटनेत्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची बंडखोरी पुन्हा समोर अली असून शहरात काँग्रेस पक्षाची पुरता वाताहत होत चालली असून पाच वर्षांपूर्वी मनपात एकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीची नगरसेवक संख्या २० वर पोहचली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरात मजबूत होत आहे तर दुसरीकडे काँग्रेसची वाताहत होतानाचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.