उल्हासनगर : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात उल्हासनगर शहर काँग्रेसने नेताजी चौक ते श्रीराम पेट्रोल पंपदरम्यान सायकल यात्रा काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असे मत यावेळी शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. या दरवाढीचा निषेध सायकल रॅली काढून शनिवारी केला. यात्रेत शहराध्यक्ष रोहित साळवे, साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, सफाई कामगार प्रदेश अध्यक्ष राधाचरण कारोतिया, महादेव शेलार, विशाल सोनवणे, दीपक सोनोने, डॉ. आझाद शेख, रोहित ओव्हाळ आदी सहभागी होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विठ्ठलवाडी पोलीस चौकीत नेऊन नंतर सोडले.