भिवंडी : तालुक्यातील सरवली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून सरपंचपदी काँग्रेसच्या संध्या नितेश चौधरी तर उपसरपंचपदी करण किशोर मार्के यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजयाने काँग्रेस वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी सचिन निळे यांच्यासमवेत ग्रामविकास अधिकारी व्यंकटी धोंडगे यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी संध्या चौधरी यांना ११ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी रतन चौधरी यांना चार मते मिळाली. उपसरपंचपदासाठी मार्के यांना १० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी मोनिका ठाकरे यांना पाच मते मिळाली. त्यामुळे संध्या चौधरी व किशोर मार्के यांची निवड जाहीर करण्यात आली. उभयतांची निवड जाहीर होताच समर्थकांकडून गुलाल उधळण्यात आला व फटाक्यांच्या आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.सरावली ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे आठ सदस्य होते. विरोधी पक्षाचे सात सदस्य होते. मात्र विरोधी गटातील तीन सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात काँग्रेसचे चोरघे यांना यश आले. आगामी काळात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण असेच प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली. यावेळी युवा नेते विनोद ठाकरे, माजी सरपंच तुळशीराम पाटील, माजी सरपंच दिनकर ठाकरे, माजी सरपंच मुकुंद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य जयहिंद चौधरी, गणेश चौधरी, माजी सभापती मोतीराम चोरघे, अभिमन्यू पाटील, युवा नेते सचिन ठाकरे, विद्याधर पाटील आदी उपस्थित होते.
सरवली ग्रामपंचायतीवर काँग्रेसने मिळवली सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 11:32 PM