ठाणे : ठाणे परिवहन समिती निवडणुकीत दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संभाव्य घोडेबाजार टळला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. समितीत काँग्रेसला स्थान न मिळाल्याने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.४ मार्च रोजी ठाणे परिवहन समिती सदस्यपदाची निवडणूक पार पडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आपला एक उमेदवार मागे घेतला, तर राष्ट्रवादीने आपला एक उमेदवार वाचविण्यासाठी काँग्रेसचा पुन्हा एकदा बळी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेसने या निवडणुकीत उडी घेतली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडी असल्यानेच पक्षश्रेष्ठींनी परिवहनसाठी अर्ज दाखल करावा, असे आदेश दिले होते. आता अर्ज मागे घेण्यासाठीसुद्धा श्रेष्ठींनीच स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. वास्तविक पाहता, महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेसला संधी देणे अपेक्षित होते. राष्ट्रवादीचे तीन सदस्य परिवहनमध्ये जाणार असतानाही शिवसेनेने माघार घेतल्याने आणि काँग्रेसला थोपविण्यात यश आल्याने या निवडणुकीत शिवसेनेचा तोटा आणि राष्ट्रवादीचा मात्र यामध्ये नफा झाला आहे. त्यातही एक वर्षासाठी राष्ट्रवादीला सभापतीपदही मिळणार आहे. त्यामुळेच आता काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. सुरुवातीला अर्ज भरायला श्रेष्ठींनी सांगितले आणि आता माघार घेण्यासही त्यांनीच सांगितले. स्थानिक कार्यकर्त्यांना केवळ उमेदवारी देण्यासाठी वापरतात आणि त्यांचा घात करतात. गटनेत्यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविली जाते, ही आमच्या पक्षाची शोकांतिका आहे.- विक्रांत चव्हाण,गटनेते, काँग्रेस
महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:24 AM