"मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:23 PM2021-11-26T20:23:32+5:302021-11-26T20:24:00+5:30
अच्छे दिनचे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून जनता अनुभवतेय, काँग्रेसची टीका.
"अच्छे दिन चे गाजर दाखवत देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आले खरे परंतु त्यांना देश चालवता आला नाही हे गेल्या ७ वर्षांपासून गोरगरीब जनता अनुभवत आहे," अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी बी.एम. संदीप यांनी केली. भाईंदरच्या उत्तन येथील महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेस तर्फे जनजागृती अभियानात ते बोलत होते.
"देशाचा जीडीपी दर घसरला असला तरी गॅस-डिझेल-पेट्रोल दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करून देशात महागाई वाढवली, बेरोजगारीने युवा वर्ग त्रस्त झाले आहेत, केंद्रीय मंत्री प्रत्येक खात्यात अपयशी ठरले आहेत, देश उभारणीत काँग्रेसची महत्त्वाची भूमिका आम्ही निर्माण केले त्या सरकारी कंपन्या व उद्योग विकण्याचे काम करीत आहेत असा आरोप केला," संदीप यांनी केला.
उद्योग-धंदे बंद पडत चालले असून नोटबंदी सारखे निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी एक वर्ष लावले, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने मोदींना माघार घ्यावी लागली. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यविषयक नियोजन न केल्याने देशात लाखो मृत्यू झाले, काँग्रेस तर्फे "कोविड न्याय" अभियान राबविण्यात येणार असून कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार मुझफ्फर हुसेन म्हणाले की , मोदी सरकारचे अपयश देशवासीयांना जनजागृती अभियानाद्वारे सांगणार असून चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांना याचा फटका बसला आहे . केवळ भांडवलदार, मोठमोठ्या उद्योगपतींना खुश करण्यासाठी मोदी काम करीत असून मनमानीने निर्णय घेतले गेल्याने देश रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला.