मीरारोड - मला सुलतान ए आझम म्हणत माझी सल्तनत खालसा करणार असे म्हटले गेले . पण मी सांगू इच्छितो कि, सुलतान ए हिंद अजमेर शरीफ यांचे छायाछत्र माझ्यावर असताना हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत घेतला.
मंत्री आव्हाड यांनी मीरारोडच्या नया नगर मधील जाहीर सभेत मुझफ्फर यांचे नाव न घेता त्यांना सुलतान ए आझम व सुलतान ए नया नगर असा टोला लावत त्यांची सल्तनत खालसा करण्याचे आवाहन केले होते . त्या वरून मुझफ्फर यांनी आव्हाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे .
एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्या विरोधात बोलायचे आणि दुसरी कडे काँग्रेस व महाआघाडी विरोधात बोलत नाही असे म्हणतात . भाजपाला पराभूत करायचे असेल तर सर्वानी एकत्र येऊन महाविकास आघाडी पालिका निवडणुकीत झाली पाहिजे, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको असे सांगतात आणि दुसरीकडे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पाडायची भाषा करतात . ह्यावरून बंटी - बबली स्वतः कन्फ्युज आहेत किंवा लोकांना कन्फ्युज करून भाजपाला फायदा करून देण्याचा त्यांचा हेतू असावा असा टोला मुझफ्फर यांनी लगावला.
सत्ता नसताना दोन वर्षां पूर्वी त्यांनी अधिवेशनात आलिशान क्लब प्रकरणी भाजपा नेत्यावर आरोप केले होते त्या बाबत आज सत्ता येऊन दोन वर्षे उलटली तरी ते चिडीचूप आहेत असे पत्रकारांनीच त्यांना विचारून संशय व्यक्त केला आहे . आमचे मीरारोड हे देशातले विकसित शहर आहे . एक किलो मीटरच्या परिसरात मोठे रस्ते , सुशोभित रेल्वे स्थानक , सरकारी रुग्णालय - रक्तपेढी , वाचनालय , अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालय , उच्च शिक्षणा साठी विविध महाविद्यालये , मैदान , उद्याने हे मीरारोड मध्ये आहे . आधी मुंब्रा - कौसा कडे बघा असा चिमटा मुझफ्फर यांनी आव्हाड यांचे नाव न घेता काढला.
स्वतःचा इलाका मोठा आहे मोठमोठ्याने ओरडून सांगतात आणि शहरात येऊन त्यांना केवळ एका भागातील १२ जागाच दिसतात. महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे . लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंती वरून काँग्रेसने मीरा भाईंदर मध्ये नेहमी साथ दिली आहे . माझ्यावर रोष ठेवण्याचे कारण कळले नाही असे मुझफ्फर म्हणाले .