भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी
By नितीन पंडित | Published: January 24, 2024 04:21 PM2024-01-24T16:21:33+5:302024-01-24T16:22:44+5:30
काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.
नितीन पंडित, भिवंडी:काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीच्या वतीने भिवंडीतील रांजणवाडी नाका येथे कोकण आढावा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.
या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथाल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,विरोधीपक्ष नेते विजय वड्डटीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आरिफ नसीम खान,चंद्रकांत हांडोर,भालचंद्र मुणगेकर,हुसेन दलवाई, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळावा प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी लोकसभा काँग्रेस लढविणार का ? या प्रश्नावर उत्तर देणे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह,प्रदेश प्रभारी व इतर माजी मंत्र्यांनीही उत्तर देणे टाळले.
इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्या नंतर या विषयावर बोलू असे उत्तर यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रश्नावर अक्षरशः चुप्पी साधली.वरिष्ठांनी या विषयी चुप्पी सधल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून कोकण विभागीय मेळाव्यानंतरही काँग्रेसकडे लोकसभा उमेदवारी येणार की,राष्ट्रवादी या लोकसभेवर आपला दावा मजबूत करणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.तर कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका मनात आणू नये पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आव्हान यावेळी काँग्रेस वरिष्ठानकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले.