अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांच्या वाट्याला मताधिक्य वाढेल, या आशेवर शिवसेना आहे. मात्र, युती झालेली असली तरी प्रत्यक्ष भाजप निवडणुकीच्या रिंगणात मनापासून उतरलेली दिसत नाही. भाजपची किंचित असलेली नाराजी हीच शिवसेनेला डोकेदुखी ठरली आहे. तर, शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे प्रयत्न काँग्रेस आणि मनसे स्वतंत्रपणे करत आहेत. शिवसेना उमेदवाराला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आणि मनसे उमेदवार बरोबरीत चालले आहे. त्यामुळे आता शिवसेनेने संघटनात्मक कामावर आणि भाजपच्या नाराजीवर लक्ष केंद्रित केले आहे.
सध्या प्रचारात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे व्यस्त आहे. अंबरनाथमध्ये तिरंगी लढत असून मनसेने कधी नव्हे ते शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. तर, अंबरनाथ पूर्व भागात काँग्रेसने शिरकाव करत शिवसेनेचा बालेकिल्ला फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांनी मतदारसंघातील प्रत्येक परिसरात प्रचार करण्यावर भर दिला आहे. एकही सभा किंवा मोठ्या नेत्यांची रॅली न घेता स्थानिक नेत्यांच्या ताकदीवरच आपला प्रचार सुरू ठेवला आहे. संघटनात्मक दृष्टीने शिवसेना भक्कम असली, तरी त्यांना भाजपकडून हवी तशी साथ मिळताना दिसत नाही. सक्रिय सहभाग दिसत नसला तरी पक्षादेश पाळण्यासाठी भाजप पदाधिकारी वरवर प्रचारात व्यस्त दिसत आहेत.
शिवसेना आणि भाजप यांच्यात समेट झालेला दिसत नसल्याने त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे करत आहेत. तर, भाजपतून मनसेत दाखल झालेले सुमेध भवार यांनीही नाराज भाजपला सोबत घेऊन छुपा प्रचार सुरू केला आहे. तसेच मनसेचे कार्यकर्तेही प्रचारात व्यस्त झाल्याने या मतदारसंघात तिहेरी रंगत निर्माण झाली आहे.मतदारसंघात मनसे उमेदवार शिवसेनेच्या हक्काच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपची मते जास्तीतजास्त प्रमाणात मनसेकडे वळती व्हावी, या आशेवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. ज्या परिसरात काँग्रेस कमकुवत आहे, त्या ठिकाणी मनसे उमेदवार चालविण्याची अंतर्गत नीती सुरू आहे. तर ज्या परिसरात कधी काँग्रेस पोहोचली नाही, त्या भागात काँग्रेस रुजविण्याचे काम केले जात आहे. अंबरनाथ पूर्व भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी त्यांच्याच किल्ल्याला भगदाड पाडण्याचे काम काँग्रेस करत आहेत.
काँग्रेसचा उमेदवार हा उल्हासनगर भागातील आहे. त्यामुळे उल्हासनगर भागात काँग्रेस प्रभावी दिसत आहे. तर, अंबरनाथमध्ये ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. पश्चिम भागात काँग्रेस भक्कम असताना आता काँग्रेसने निवडणुकीच्या निमित्ताने पूर्व भागावरही लक्ष केंद्रित केले आहे. मनसेचे उमेदवार भवार यांनी प्रचारफेरी आणि वैयक्तिक भेटींवर लक्ष केंद्रित केले आहे.आमदार किणीकर यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बळाचा वापर करून प्रचार सुरू केला आहे. चौकसभा आणि रॅलीवरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिलांच्या माध्यमातून घरोघरी पत्रके वाटण्याचे काम केले जात आहे. काही काळ शिवसेनेच्या संघटनात्मक वादाचा फटका किणीकर यांना सहन करावा लागला. मात्र, वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने आता वाद मिटले आहेत. त्यातच संपूर्ण संघटना कामाला लावण्यात आली आहे.
भाजपचे नाराज पदाधिकारी आणि नगरसेवकांना सेनेसोबत प्रचारात जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथमधील शिवसेनेची असलेली ताकद आणि उल्हासनगरमध्ये संघटनात्मक बळाचा वापर करून मताधिक्य वाढविण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. एकूणच शिवसेनेसाठी ही निवडणूक काही प्रमाणात डोकेदुखी ठरू शकते.पक्षासोबत नसलेल्या कार्यकर्त्यांची चांदीराजकीय पक्षासोबत नसलेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच चलती आहे. कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी शिवसेना, मनसे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. काही कार्यकर्ते तिन्ही पक्षांकडून आर्थिक लाभ मिळविण्याचे प्रयत्न करत आहेत. तर, काही ठिकाणी आपल्यामागे जनसमुदाय दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.