लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एखाद्याने टीका केली तर त्याच्या विरोधात व्यक्तिगत जाऊन कारवाई करणे हे लोकशाहीला न परवडणारे आणि भूषणावह नाही. केंद्रातील भाजपला आम्ही सल्ला देत आहोत की, या ब्लॅकमेलिंगच्या धंद्यातून बाहेर पडावे. भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. दुसरीकडे नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना सरकार आणि संघटनेमध्ये फरक असल्याचे सांगून त्यांचा निर्णय घेण्यास किंवा उत्तरे देण्यास सरकार सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने ते बुधवारी ठाण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढली. त्यामध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. अधिवेशनात लोकांचे प्रश्न मांडले जावेत, सोडविले जावेत, अशी अपेक्षा असते.
मात्र, भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे. मात्र, विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत, सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप ही सर्वांत मोठी भ्रष्टाचार करणारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर याचे परिणाम व्हावेत, यासाठी आर्यन खानवर बळजबरीने ड्रग्जचे गुन्हे दाखल केले होते. हा निवडणुकीसाठीचाच एक फंडा असल्याचा दावाही त्यांनी केला.
...तर ठाण्यात ओबीसी महापौर
ओबीसी आरक्षणाबाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे. परंतु, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर व उपमहापौर येथे बसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.