ठाणे : मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रवादीने आपला अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. मात्र, काँगे्रसनेच आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादीने त्यांना दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऐन वर्षभरावर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दुफळी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून दोन्हींत फारकत झाल्याने आता निवडणूक अटळ आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षा साजिया परवीन सरफराज अन्सारी यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने येथे आपले उमेदवार उभे केले आहेत. परंतु, राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळून आपला अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली होती. परंतु, राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला केवळ सहा महिन्यांचा शब्द दिला होता. उलट, त्यांनी तीन महिने अधिकचे घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसनेच आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नसल्याचा इशाराही लोकशाही आघाडीचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी दिला आहे.विरोधी पक्षनेतेपद देणार का, असा सवाल भोईर यांना केला असता आम्ही लोकशाही आघाडीत असताना स्वतंत्र गटासाठी काँग्रेसनेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनीच आपली वेगळी चूल तयार केली आहे.
मुंब्य्रातील अर्ज माघारीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने
By admin | Published: February 04, 2016 2:33 AM