अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहून महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम पालिकेचे काही अधिकारी करीत असतात. सर्वसाधारण सभेला सर्व अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र पालिकेच्या नगररचना विभागाचा पदभार सांभाळणारे संजय हिंगमिरे हे सतत सर्वसाधारण सभेला गैरहजर राहत असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला.अधिकारी सभागृहात उत्तर देण्यासाठी येत नसल्याने या अधिका-यांच्या गैरपद्धतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सभात्याग केला. अखेर हिंगमिरे यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिका-यांनी स्पष्ट केल्यावर पुन्हा सभा सुरू झाली.अंबरनाथ पालिकेची सोमवारची सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. सभा सुरू झाल्यावरच अधिका-यांच्या गैरहजेरीबाबत काँग्रेसने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी ज्या दोन अधिका-यांवर आहे ते दोन्ही अधिकारी आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर होते. लोकशाही दिनासाठी जाणे गरजेचे असल्याने शहर अभियंते मनीष भांमरे आणि नगररचना विभागाचे काम पाहणारे अधिकारी संजय हिंगमिरे या दोघांना पाठविण्यात आले. मात्र हिंगमिरे हे सभेला उत्तर देण्यासाठी कधीच सभागृहात येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. प्रत्येक वेळी काहींना काही कारणे देऊन सभेला गैरहजर राहणा-या अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदविण्यात आले.संबंधित अधिकारी दादागिरीची भाषा करित असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील केला. येवढेच नव्हे तर संबंधित अधिकारी हा पालिकेकडे आलेल्या तक्रारी बाहेरील व्यक्तींना सांगून भांडणे लावण्याचे काम करित असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपावर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी देखील शिक्कामोर्तब करीत हा अधिकारी भांडणे लावण्यात तरबेज असल्याचे मत व्यक्त केले. पालिकेची कामे कमी तर बांधकाम व्यवसायिकांची कामेच करण्यात हा अधिकारी व्यस्त असल्याने त्याला पदमुक्त करण्याची मागणी काँग्रेसने केली.मात्र प्रशासन या प्रकरणी ठोस उत्तर देत नसल्याने काँग्रेसने सभात्याग करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. काँग्रेसच्या सभात्यागानंतर उपनगराध्यक्ष वाळेकर, राष्ट्रवादीचे गटनेते सदाशिव पाटील यांनी काँग्रेस नगरसेवकांची समजूत घालून पुन्हा सभागृहात येण्याची मागणी केली. मात्र जोपर्यंत हिंगमिरे यांच्यावर ठोस कारवाई होत नाही तोवर सभागृहात येणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर मुख्याधिका-यांनी या वादग्रस्त अधिका-याला सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तसेच त्याला पदमुक्त करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी सभागृहाने केली. या निर्णयानंतर पुन्हा सभा सुरू झाली.पालिकेच्या सभेला सुरुवात झाल्यावर नगरसेवक संदीप लोटे यांच्या विरोधात स्वच्छता निरीक्षकाने पालिकेचे मुख्याधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर गुन्हा कसा दाखल केला याचा जाब विचारला.तसेच गुन्हा दाखल करतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केल्याने नगरसेवक स्वच्छता निरीक्षक पुंडलिक शेकटे यांच्या निलंबनाची मागणी करीत होते. यावर निलंबन करता येणार नसले तरी त्यांची विभागीय चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. याच मुद्याला अनुसरुन काँग्रेस नगरसेवक आणि भाजपा नगरसेवकांनी पालिकेतील स्वच्छता निरिक्षकांच्या पदव्या तपासण्याची मागणी उचलुन धरली. अनेकांच्या पदव्या ह्या बेकायदेशिर असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावर मुख्याधिका-यांनी सर्व स्वच्छता निरिक्षकांच्या पदवी तपासुन योग्य ती कायदेशिर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
काँक्रिटच्या निविदा केले रद्द अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे ही 10 ते 14 टक्के कमी दराची असल्याने या रस्त्यांच्या कामाचा दर्जा योग्य राखणो शक्य नसल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सोबत जीएसटीचे दर आणि नवीन डीएसआरचे दर या निविदांना नसल्याने नव्या डीएसआर दराने या निविदा काढण्याची सुचना नगरसेवक अब्दुल शेख यांनी केली. या सुचनेला सदाशिव पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे शहरातील काँक्रि टच्या रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्याचा प्रयत्न या निर्णयामुळे झाला आहे.भाजपा - काँग्रेसमध्ये शाब्दिक वादावादीने सभागृह तंगपालिकेतील विकास आराखडय़ातील रस्त्यांचे आरेखन करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यावरुन काँग्रेसचे गटनेते प्रदिप पाटील आणि भाजपाचे नगरसेवक भरत फुलोरे यांच्यात वादावादी झाली. अधिकारी सभागृहात येत नसल्यानेच आपल्याला उत्तर मिळत नसल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तर फुलोरे यांनी काँग्रेसच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व काही करणार नाही असा आक्षेप नोंदविला. या वादावातीत फुलोरे यांनी पाटील यांना आपली कामांमध्ये हिस्सेदारी आहे असा आरोप केल्यावर काँग्रेस नगरसेवकांनी फुलोरे यांना चांगलेचे धारेवर धरले. वैयक्तीक आरोप कसे केला असा जाब काँग्रेस नगरसेवकांनी विचारला. यावेळी सभागृहातील तंग झालेले वातावरण पाहता काँग्रेस नगरसेवकांना आवारण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवकांनी केला. वातावरण जास्त तंग होऊ नये यासाठी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी सर्व विषय मंजूर करून ही सभा गुंडाळली.