अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी आघाडीच्या गोटात राष्ट्रवादीच्या वाट्याला होता. मात्र गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने आता या मतदारसंघावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ पुन्हा स्वत:च्या वाट्याला ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यावर हा मतदार संघ आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीला सोडण्यात आला. आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसनेही तशी साथ दिली. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने दोन्ही पक्षांना या मतदारसंघात आपली ताकद अजमावता आली. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार करता शिवसेनेचे बालाजी किणीकर हे विजयी झाले. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मतांची आकडेवारी पाहता काँग्रेस उमेदवार तिसºया क्रमांकावर राहिला आणि राष्ट्रवादी हा चौथ्या क्रमांकावर राहिला. मतांची आकडेवारी पाहता कॉंग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते मिळाली होती. याच मतांच्या आधारावर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत अंबरनाथ मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा चांगली मते मिळाल्याने या मतदारसंघावर काँॅग्रेसने भक्कम दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अंबरनाथमधील दोन्ही पक्ष हे मतदारसंघ स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करत असले तरी दोन्ही पक्षांकडे भक्कम असा उमेदवार नसल्याने युतीतील दोन्ही पक्ष निश्चिंत दिसत आहेत. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि युतीबाबत काय निर्णय होणार यावर सर्व ठरणार असल्याने सर्वच पक्ष आपापल्यापरीने मतदारसंघावर दावा करताना दिसत आहेत.
भाजपचे इच्छुक आघाडीच्या संपर्कातदुसरीकडे, दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. किणीकर यांचा मतदारसंघातील दावा हा भक्कम झाला आहे. सलग दोन वेळा विजयी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र भाजपनेही उमेदवाराची तयारी केली आहे. युतीचा धर्म पाळला गेल्यास भाजपच्या उमेदवाराला सबुरीचा सल्ला द्यावा लागेल. त्यामुळे स्थानिक भाजपचे पदाधिकारी युती तुटण्याची वाट पाहत आहे. मात्र हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असल्याने भाजपचे इच्छुक उमेदवार हे आघाडीतील पक्षाच्या संपर्कात आहेत.