उल्हासनगर : लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या तब्बल १४२ पेक्षा जास्त खासदारांना निलंबित केल्याबद्दल शहर काँग्रेसने गुरवारी नेहरू चौकात केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उल्हासनगर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरवारी दुपारी नेहरू चौकात एकत्र येऊन काळ्या फिती लावून मोदी सरकारचा निषेध केला. भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था असून हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाची भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या १४२ पेक्षा जास्त खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले. या निषेधार्थ शहर काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही मूल्यांची हत्या केल्याचा आरोप करून निषेध आंदोलन केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत मोदी सरकारचा निषेध केला.
शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन झाले असून यावेळी माजी शहराध्यक्ष राधाचरण करोतिया, वज्जरुद्दिन खान, किशोर धडके, नाणिक अहुजा, माजी महापौर मालती करोतिया, कुलदीप ऐलसिंघानी, सुनील बेहरानी, अझीझ खान, अशेराम टाक, शंकर अहुजा, मनीषा महाकाळे, राजेश मल्होत्रा, फामिदा खान, शहबुद्दीन खान, विद्या चौहान, राजकुमारी नारा, सिंधुताई रामटेके, सुधा शास्त्री, मनोहर मनुजा, श्याम मढवी, ईश्वर जागियासी, विशाल सोनावणे, डॉ धीरज पाटोळे, निलेश जाधव, संदीप बटुले, सॅम्युएल माऊची, वामदेव भोयर, दीपक गायकवाड, योगेश शिंदे, सुलक्षण भालेराव आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.