सदानंद नाईक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची चौकशी लावण्यात आल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष रोहित साळवे, माजी शहराध्यक्ष राधाचरण करोतीया यांच्यासह शहर पदाधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ नेहरू चौकात गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडी चौकशी लावली असून देशवासिया ही कारवाई बघत असून वेळ आल्यावर भाजपाला धडा शिकविणार असल्याचा विश्वास यावेळी शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी व्यक्त केला. या कारवाईचा विरोध करण्यासाठी संपूर्ण देशात काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध आंदोलन करीत आहेत. शहरात जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू चौकात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ईडी चौकशी विरोधात आंदोलन केले.
केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सुडबुध्दीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष करीत असून आज संपूर्ण देश पाहत आहे. भाजपा सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरुन सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे हुकूमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा करीत असलेल्या गैरवापराविरुध्द काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकजुटीने मा. काँग्रेस अध्यक्षांसोबत उभे आहेत, असे यावेळेस साळवे यांनी पत्रकारांना सांगितले. आंदोलनात राधाचरण करोतिया, किशोर धडके, नानिक अहुजा, नंदकुमार गोरे, मालती करोतिया, वज्जिरुद्दिन खान, महादेव शेलार, दीपक सोनोने, विशाल सोनवणे, माहेश्वरी शेट्टी, मनीषा महाकाले, अनिल सिन्हा, सुनिल करोतिया, मन्नू मनुजा, ताराचंद तायडे, आबा साठे, गणेश मोरे, भागवत तायडे, विलास डूबे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.