ठाणे : दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी काँग्रेसने समर्थन आंदोलन केले. त्यानुसार गुरुवारी ठाण्यातही काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन करून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
ठाण्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. वागळे इस्टेट येथील आयटीआय सर्कलजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्ष विनय विचारे, डॉ. अभिजित पांचाळ यांनी शेतकरी समर्थनार्थ निदर्शने केली तर वर्तकनगर येथे ब्लॉक अध्यक्ष आनंद सागळे, मुंब्रा येथेही मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा दीपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक अध्यक्ष नीलेश पाटील यांनी निदर्शने केली. तर कळवा येथेही ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी व रवींद्र कोळी तर लोकमान्यनगर येथे ब्लॉक अध्यक्ष राजू हैबती यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
ठाण्यातील शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाबाहेर ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, नरेंद्र कदम व नीलेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेससह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.
सामाजिक संघटनांचा शेतकऱ्यांना पाठिंबा केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतमालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतक-यांवरील दडपशाही थांबवा, लोकशाहीत संविधानाचा आदर राखून शेतक-यांचे म्हणणे ऐकून सन्मानाने संवाद साधावा आदी मागण्यांसाठी व दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास ठाणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन करून पाठिंबा दिला. श्रमिक जनता संघ, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, महाराष्ट्र किसान सभा, भारतीय महिला फेडरेशन आदी विविध संघटनांनी एकत्र येऊन कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जनआंदोलनाच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.
मुंब्र्यातही काँग्रेसचे आंदोलनकृषी कायद्याविरोधात देशात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसने मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेले अन्नधान्य थेट बाजारात विकता येणार नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हा कायदा परत घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या. मुंब्रा प्रभाग समितीच्या अध्यक्षा दीपाली भगत, पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल भगत, ब्लाॅक अध्यक्ष निलेश पाटील, समाजसेवक मोतीराम भगत तसेच भोलानाथ पाटील आदी उपस्थित होते.