ठाणे : महापालिका प्रशासन खाजगीत बोलताना सांगते, की क्लस्टर अमलात येणे शक्य नाही. परंतु, पालकमंत्री सांगतात म्हणून ती रेटत आहोत. यावरून प्रशासन हे पालकमंत्र्यांची फसवणूक करून त्यांना गंडवत असल्याचा आरोप ठाणे महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या योजनेला काँग्रेसचा विरोध नसून तिच्या प्रक्रियेला विरोध असल्याचे सांगून तिच्या भूमिपूजनाला काँग्रेस शहराध्यक्षांशिवाय पक्षाचे नगरसेवक अथवा पदाधिकारी जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.
गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्लस्टर योजनेच्या कामाचे भुूमिपूजन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवताना तीत आजघडीला कशा त्रुटी आहेत ते सांगण्यासाठी काँग्रेसने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी ही योजना काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केल्याचे सांगितले. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ती राबविणे गरजेचे आहे. परंतु, हे करताना त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे.
ठाणे काँग्रेसने ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, शैलेश शिंदे आणि निशिकांत कोळी या चार जणांची एक कमिटी तयार केली होती. तिने या योजनेत कोणत्या त्रुटी आहेत, याचा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार ती राबवताना काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे. परंतु, त्या न करता सत्ताधाऱ्यांकडून लग्नीनघाई होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आम्ही या मुद्यावर जनतेच्या बाजूने आहोत असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारसोबत शिवसेना असताना काँगे्रस जशी चुकीच्या गोष्टींना विरोध करत होती, तसेच आताही करीत असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे संजय घाडीगांवकर, सचिन शिंदे, राजेश जाधव, के.वृषाली, राहूल पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘जनसामान्यांना घरे मिळाली पाहिजे’
ठाण्याची क्लस्टर योजना काँगे्रसचे बाळ आहे. ही योजना पारदर्शकरित्या राबवावी, एसआरप्रमाणे रखडू नये, असे आमचे मत आहे. जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत योजनेच्या प्रक्रियेला काँग्रेसचा विरोध राहणार आहे. या योजनेला आमचा विरोध नाही, असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या योजनेतंर्गत सामान्य नागरिकांना घरे मिळालीच पाहिजे. मुख्यमंत्री भूमिपूजन करून जातील. परंतु, जनतेचे काय, असाही सवाल त्यांनी केला.