लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पदासाठी नगरसेवकांच्या गोपनीय बैठका सुरू झाल्या असून काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनाही कमालीची आग्रही आहे. काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आपण नेहमीच मदत करत आलो आहोत. त्यामुळे यावेळी हे पद शिवसेनेला द्यावे, अशी आग्रही भूमिका सेनेच्या काही नगरसेवकांनी घेतल्याने काँग्रेस-सेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी काँग्रेसच्या महापौरपदाच्या पराभूत उमेदवार नगरसेविका रिषिका राका यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी माजी महापौर जावेद दळवी यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला हे पद मिळावे, यासाठी सेना नगरसेवकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना गळ घातली आहे.
काँग्रेस नगरसेवकांनी यासाठी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले आहे. भिवंडी शहर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांना भाजपच्या २० नगरसेवकांसह काँग्रेसच्या १८ फुटीर नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रिषिका राका यांना दारु ण पराभव पत्करावा लागला होता.उपमहापौरपद काँग्रेसचे फुटीर गटाचे इम्रान खान यांना मिळाल्याने महापालिकेत काँग्रेसचा सत्ताधारी ब गट निर्माण झाला आहे. महापालिकेत सेनेचे १२, तर काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
महापौरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षच्सध्या विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे आहे. मात्र, भाजपने कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा दिल्याने ते सत्ताधारी झाले आहेत. त्याचबरोबर कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या नगरसेवकांना उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद दिल्यामुळे तेसुद्धा सत्तेत सामील झाले आहेत.च्त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेला मिळावे, असा आग्रह शिवसेना नगरसेवकांनी धरला आहे. दरम्यान, महापौर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडे असलेले सभागृह नेतेपद काढून कोणार्क विकास आघाडीकडे दिले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद त्या कोणाच्या पदरात टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.