काँग्रेसची तिघांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:24 AM2019-01-31T00:24:16+5:302019-01-31T00:24:32+5:30
काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने शहरात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत बॅनरबाजीवरून स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले होते.
कल्याण : काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने शहरात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत बॅनरबाजीवरून स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले होते. याप्रकरणी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा अशा तिघांना नोटीस बजावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी जनसंघर्षयात्रा काढली. त्यानिमित्ताने पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) येथे जाहीर सभा घेतली. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. परंतु, प्रमुख नेत्यांचे आगमन होण्याच्या अगोदर सभेच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर युवक काँगे्रसच्या नेत्यांचे फोटो नसल्याने वाद निर्माण झाला.
संजय दत्त यांच्या गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हरकत घेतल्यानंतर बॅनर बदलण्यात आला. परंतु, बदललेल्या बॅनरवर स्थानिक नेते प्रकाश मुथा यांचा फोटो आकाराने लहान असल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले. यात मुथा आणि दत्त गट चक्क हातघाईवर येत एकमेकांना भिडले. हा सर्व तमाशा पत्रकार आणि सभेला आलेल्या नागरिकांसमोर घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने सभेच्या ठिकाणी निर्माण झालेला तणाव निवळला. हा प्रकार घडला तेव्हा पोटे घटनास्थळी नव्हते.
दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल प्रदेश नेत्यांनी घेतली आहे. मुथा, पोटे आणि कुलकर्णी यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता नोटीस मिळाल्याचे मान्य केले, तर मुथा यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
...तर सामोरे जाईन
सभेतील त्या घटनेप्रकरणी मला नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, आम्ही सभेला गालबोट लागेल किंवा पक्षाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केलेले नाही. जर याचे पुरावे असतील, तर आम्ही प्रदेशाध्यक्षांच्या कारवाईला सामोरे जायला तयार आहोत, असे मत पोटे यांनी व्यक्त केले.