ठाणे : ‘चैत्र नवरात्र उत्सव झाला राजकीय आखाडा’, अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करणारे काँग्रेसचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना काही अनोळखी व्यक्तींनी चोप दिला. या मारहाणीविरोधात काँग्रेसने आवाज उठविला असून केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविण्यासाठी मारहाण करण्यात आल्याचा दावा कोळी यांनी केला. मारहाण करणाऱ्यांपैकी एक पदाधिकारी हा शिवसेनेचा असल्याचा आरोप त्यांनी केला व त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे, प्रवक्ते सचिन शिंदे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बुधवारी रात्री कोपरीत काहीजणांनी कोळी यांना अडवून ‘साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो, त्यांना बदमान का करतो,’ असे सांगत पोस्ट डीलीट करण्यास सांगितले व मारहाण केली. त्यानंतर भीतीपोटी कोळी यांनी ती पोस्ट डीलीट केली.
कारवाई न झाल्यास आंदोलन
केवळ आपले महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी हा भ्याड हल्ला केला असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील २४ तासांत संबंधिताना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. कारवाई न झाल्यास मारहाण करणाऱ्याच्या घराबाहेर आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोळी यांनी कोणाच्याही भावना दुखवतील, अशा स्वरूपाचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले नव्हते. या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.