- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर काँग्रेसनेभारत बंदला पाठिंबा देऊन नेहरू चौकात पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने केली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेकारीत वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडल्याचा आरोप यावेळी शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.
उल्हासनगरकाँग्रेसने केंद्र शासनाच्या किसान विरोधी धोरणांना विरोध करीत अनेक मुद्द्यांवर भारत बंदला समर्थन देत नेहरू चौकात निदर्शन केली. केंद्रातील मोदी सरकारने किसान विरोधी तीन काळे कायदे आणून या देशातील शेतकरयांना देशोधडीला लावण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी रोहित साळवे यांनी केली.
सर्व सार्वजनिक उपक्रम मधिल रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दुरसंचार आणि बंदरे इत्यादी एक-एक करून विकण्यात येत आहे. तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने, कोट्यवधी नागरिकांच्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांचे दर गगनाला भिडले असून नागरिकांत संताप व्यक्त होत असल्याचा आरोप रोहित साळवे यांनी केला.
देशातील शेतकरी संघटना व डाव्या आघड्यानी भारत बंदचे आव्हान केले. या भारत बंदला शहर काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन नेहरू चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजारपेठ बंद करून निदर्शन केली. निदर्शनात किशोर धडके, महादेव शेलार, आसाराम टाक, दीपक सोनोने, विशाल सोनवणे, नियाज खान, अख्तर खान, अनिल सिन्हा, फरियाद शेख, रोहित ओव्हाळ, गणेश मोरे, मनोहर मनुजा, अनिल यादव, वी. सी. विनोदन, संतोष वानखेडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.