काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा ,भिवंडी लोकसभेवर करणार दावा
By नितीन पंडित | Published: January 20, 2024 05:09 PM2024-01-20T17:09:02+5:302024-01-20T17:10:13+5:30
भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा.
नितीन पंडित, भिवंडी : कोकण विभागातील सात लोकसभा मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून त्याच दृष्टीने रणनीती आखण्यासाठी कोकण विभागीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा भिवंडीत २४ जानेवारी रोजी होत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी राजेश शर्मा यांनी शनिवारी भिवंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या प्रसंगी काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे, प्रदेश युवक सरचिटणीस विरेन चोरघे, जिल्हा सरचिटणीस पंकज गायकवाड,तालुकाध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण विभागात भिवंडीसह कल्याण,पालघर,रायगड,रत्नागिरी,मावळ या लोकसभा मतदार संघांचा समावेश होत असून यापैकी फक्त भिवंडी लोकसभेवर काँग्रेसचा दावा असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनिथाल ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते विजय वड्ट्टीवार,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह मोठ्या संख्येने प्रदेश व राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी भिवंडीत उपस्थित राहणार असून या सर्व विभागातील जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या साठी मार्गदर्शन असणार आहे.
जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वा खाली या मेळाव्याचे आयोजन वाटिका हॉटेल येथे करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करून काँग्रेस भिवंडी लोकसभा काँग्रेस महाआघाडीच्या सहकार्याने प्रचंड मताधिक्याने जिंकणार हा विश्वास व्यक्त केला जाणार आहे असे शेवटी राजेश शर्मा यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.