उल्हासनगर : महागाई मुक्त भारत या अभियानाअंतर्गत घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढली. या आंदोलनात शहराध्यक्ष रोहित साळवे, गटनेत्या अंजली साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या वतीने दुपारी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीचा निषेध करून प्रांत कार्यालयावर गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. उल्हासनगरचे पक्ष प्रभारी माजी खासदार हुसैन दलवाई, सहप्रभारी व महाराष्ट्र सचिव मनोज शिंदे यांच्या मार्गर्शनाखाली शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरची ढोल ताशा वाजवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अनोखं आंदोलन सोमवारी दुपारी प्रांत कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करून महागाई विरोधात मोदी सरकार हे अपयशी झाले ठरल्याची टीका केली. आंदोलनात सफाई कामगार सेलचे अध्यक्ष राधाचरण करोतिया, काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे, सुनील बहराणी, नानीक आहुजा, उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.