लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षातून बाहेर फेकणे अथवा रिक्षामध्ये महिलांसोबत छेडछाड करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. परंतु, यामुळे आपल्या उपजीविकेसाठी ज्या महिला रिक्षा चालवत आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे रिक्षा चालकांकडून असे प्रकार घडत असतांना एखाद्या प्रवाशानेच महिला रिक्षा चालकाबरोबर अश्लिल वर्तन केले तर आम्ही दाद कोणाकडे मागायची असा सवाल आता महिला रिक्षाचालकांनी केला आहे. त्यामुळे महिलांच्या रिक्षामधील जीपीएस सिस्टीम ही पोलीस कंट्रोल रूमशी जोडली गेली पाहिजे, ज्यामुळे पोलीस यंत्रणादेखील आमच्या बरोबर राहून आम्ही सुरक्षित राहू, असा विश्वास या महिला रिक्षा चालकांनी व्यक्त केला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहरात प्रवासाची अनेक साधने असली तरी ठाणे परिवहनच्या संथ कारभारामुळे रिक्षा हे महत्त्वाचे साधन प्रवाशांच्या दृष्टीने बनले आहे. परंतु, बुधवारी रात्री एका मुलीची छेड रिक्षाचालकाने काढल्याची घटना समोर आली. मागील काही महिन्यात रिक्षातून महिलांना फेकणे किंवा विनयभंग करणे अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकट्या दुकट्या महिलेने रिक्षात बसायचे की नाही? असा प्रश्न समस्त महिलांना पडू लागला आहे. काही वर्षापूर्वी स्वप्नाली लाड या मुलीला चालत्या रिक्षातून फेकण्यात आले होते, ही घटना कापूरबावडी या ठिकणी घडली होती. त्यातून स्वप्नाली कशबशी बचावली होती. पुढे काही महिन्यातच रत्नागिरीवरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींना एक रिक्षाचालक पळवून घेऊन चालला होता. त्यावेळी नितीन पुलाजवळ या मुलींनी आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती. या सर्व घटना ठाणेकर विसरत नाही तोच एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तिने प्रतिकार केल्यामुळे तिला रिक्षातून बाहेर फेकण्यात आले. ती मुलगी जरी या घटनेतून बचावली असली तरी मात्र सतत सुरु असलेल्या या घटनेमुळे रिक्षाचालक व असे प्रवाशी यांचा धसका ठाण्यातील महिलांनी घेतला आहे. त्यात आता ज्या महिला आपल्या उपजीविकेसाठी रिक्षा चालवत आहेत. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आजघडीला अशा रिक्षा चालकांची संख्या ही २०० च्या वर गेली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षिततादेखील आता तितकीच महत्वाची ठरली आहे. आम्ही एकट्या असतो आणि मागे तीन प्रवासी बसलेले असतात ते कोण, कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हे कोणीच ओळखू शकत नाही. त्यांच्य बरोबर आम्हाला कधी कधी लांबच्या पल्यापर्यंत जावे लागते. अशा वेळी एखादा कोणी वाईट प्रवृत्तीचा प्रवासी निघाला, तर आम्ही काय करणार असा सवाल आता या महिला रिक्षा चालकांना सतावू लागला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या रिक्षात जीपीएस सिस्टीम लावण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु ही प्रणाली आरटीओ विभागाशी जोडण्यात आली आहे. ज्या प्रकारे या घटना वाढत आहेत त्या अनुषंगाने ही जीपीएस सिस्टीम ठाणे पोलीस कंट्रोल रूमशी जोडली गेली तर आम्ही सतत पोलिसांच्या छत्रछाये खाली राहू आणि सुरक्षित राहू अशी मागणी या महिला रिक्षाचालकांनी केली आहे. तसेच आम्हाला पुरु ष रिक्षाचालकांनाचादेखील मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते नेहमीच आमच्याशी उद्धट बोलतात, कट मारून जातात, रिक्षा अंगावर घालण्याचादेखील प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या बाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार केला जाईल, असे ठाणे पोलीस वाहतूक विभागाने सांगितले आहे.
जीपीएस प्रणाली नियंत्रण कक्षाशी जोडा
By admin | Published: July 07, 2017 6:24 AM