कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला लागणारी आग, धूर व दुर्गंधी यामुळे एक आजी आपल्या नातीच्या सहवासाला पारखी झाली. डम्पिंग ग्राउंडमुळे या परिसरात राहणाºया काही तरुणांची लग्ने जुळत नसल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले होते.डम्पिंग परिसराजवळील सुमंग इमारतीत राहणारे उदय व स्मिता जोशी यांना श्रीरंग नावाचा मुलगा आहे. श्रीरंगला कन्यारत्नाचा लाभ झाला. आजीआजोबा झालेल्या उदय व स्मिता यांना मोठा आनंद झाला. त्यांची नात राज्ञी ही ११ महिन्यांची आहे. काही दिवसांपूर्वी आठवडाभराच्या अंतराने डम्पिंगच्या कचºयाला आग लागली होती. या आगीचा धूर ११ महिन्यांच्या राज्ञीच्या नाकातोंडात जाऊन तिला त्रास होऊ लागला. राज्ञीला वरचेवर ताप येऊ लागला. डॉक्टरांकडे तिला धुरामुळे त्रास होत असल्याचे सांगितले. दर १२ तासांच्या अंतराने तिला इंजेक्शन देण्यात आली. राज्ञी बरी झाल्यावर आईने तिला तिच्या माहेरी नेले, त्यावेळी राज्ञीला कसलाही त्रास झाला नाही. मात्र, कल्याणच्या घरी येताच तिला पुन्हा धुराचा त्रास झाला.दरम्यानच्या काळात राज्ञीचे वडील श्रीरंग यांची काही कामानिमित्त पुण्याला बदली झाली. राज्ञी आपल्यासोबत राहावी, अशी तिच्या आजीआजोबांची इच्छा होती, पण तिचे सततचे आजारपण पाहून तिच्या वडिलांनी तिला पुण्याला नेले. राज्ञीची आजी स्मिता यांचे मन काही लागत नाही. नातीच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावतात. डम्पिंग ग्राउंडचा त्रास नसता, तर माझी नात माझ्यासोबत राहिली असती, असे त्या सांगतात.डम्पिंग बंद करण्यासाठी पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही. डम्पिंगवर आजही कचरा टाकला जात आहे. त्याचे वर्गीकरण होत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी डम्पिंगच्या कचºयावर पाणी मारण्यात आले. सभेच्या वेळी दोन तासांत कुठल्याही प्रकारची दुर्गंधी आली नाही. म्हणजे, पंतप्रधानांकरिता महापालिका हे करू शकते. व्हीव्हीआयपींच्या आरोग्याची काळजी घेणारी महापालिका सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी का खेळते, असा सवाल नागरिक करत आहेत.