ठाणे : राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर अखेर ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन मुदत वाढ देण्यात आली नसून पालिका प्रशासनाच्या वतीने अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या ठाणेकरांना आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेक्स वगळून सर्वप्रकारच्या बाजारपेठा,भाजी मार्केट आणि दुकानांना सम -विषम तारखेनुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण शहरात अनलॉक करण्यात आला असला तरी, हॉटस्पॉटमध्ये मात्र लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली असून २७ हॉटस्पॉट क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या अध्यादेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून असून दररोज मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १५ हजारांच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गेला असून ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष करून ग्रामीण भागांपेक्षा जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात रुग्ण वाढीचे आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असून पालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी २ ते १२ जुलैपर्यंत पालिका क्षेत्रामध्ये कडकडीत लॉकडाऊन जारी केला. त्यानंतर कल्याण- डोंबिवली, मीरा- भार्इंदर, नवी मुंबई महापालिकांनीही कडक लॉकडाऊन जाहिर केला. पहिल्या ११ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नसल्याने सर्व पालिका आयुक्तांनी टाळेबंदी १९ जुलैपर्यंत वाढवली. कंटेनमेंट झोनसह हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची पोलिसांनी यशस्वी अंमलबजावणी केली. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा मात्र कमी झालेला नाही. या लॉकडाऊनच्या काळात डॉ विपीन शर्मा यांनी कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा देखील घेतला होता.
लॉकडाऊनमध्येही रुग्णांची संख्या वाढतच असल्याने १९ जुलैचा लॉकडाऊन पुढे ३१ जुलै पर्यंत होणार असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर पडल्या होत्या. त्यामुळे व्यापारी वर्गात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. लॉकडाऊन वाढीला राजकीय विरोध देखील होत झाला होता. भाजपने तर थेट पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना पत्र देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने देखील लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. त्यामुळे ठाण्यात लॉकडाऊन उठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते . संपूर्ण ठाण्यात अनलॉक करण्यात येणार असला तरी नागरिकांना गर्दी करता येणार नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले सर्व नियम पाळूनच सर्व व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली असून सर्व निर्बंध लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.