मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराने बंद पाडली असून शहरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारासोबत सत्ताधारी आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण संगनमत असल्याने चौकशी करावी. कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तर ठेकेदाराने पगार दिला नाही म्हणून कर्मचारी देखील धरणे धरून आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेने बससेवा चालवण्यासाठी नेमलेल्या भागीरथी एमबीएमटी या ठेकेदाराला महापालिकेने मोफत बस व अत्याधुनिक डेपो आदी सर्व दिलेले असताना पालिका त्याला प्रति किमी २६ रुपये देखील देते. तिकीटाचे उत्पन्न, जाहिरातीचे पैसे देखील ठेकेदाराचे घेतो. ठेकेदाराचे इतके लाड का? असा सवाल नागरिक आधीपासून करत असताना दुसरीकडे ठेकेदाराने शहरातील बससेवा अजूनही सुरू केलेली नाही.
कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी तसेच परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी बस सेवा चालवली जात होती. चाललेल्या बसप्रमाणे ठेकेदारास पालिकेने पैसे दिले. परंतु ठेकेदाराने पुरवणी करार करून विविध खर्च व कामाचे अतिरिक्त पैसे मागितले. तर कोरोना काळात मोजक्याच कर्मचाऱ्याने बोलावून काम दिले बहुतांश कर्मचाऱ्यांना नाही असा आरोप करत मार्च - एप्रिल पासूनच पगार कर्मचारी मागत आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने धरणे आंदोलन केली. आत देखील २४ सप्टेंबरपासून बसडेपोच्या बाहेर कर्मचारी धरणे धरून आहेत.
पालिकेने सतत सांगून देखील ठेकेदाराने बससेवा सुरू केली नाही. १४ ऑगस्ट पासून केवळ उत्तन मार्गावर ५ बस सुरू केल्या त्या देखील ८ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्या. जेणे करून शहरातील नागरिकांचे पालिकेची बस नसल्याने प्रचंड हाल होत असून त्यांना नाईलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. सर्वात जास्त हाल तर उत्तन - पाली - चौक वासियांचे होत आहेत.
पालिका प्रशासनाने मोठ्या जोशात सांगितले होते की, ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली असून ठेका रद्द करून पालिका बस चालवेल. पगारासाठी धरणे धरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील पालिकेने बस सुरू केली तर आम्ही सहकार्य करू अशी भूमिका घेतली. पालिकेने कर्मचाऱ्याने सोबत बैठका घेऊन देखील घुमजाव करत पुन्हा ठेकेदारासच बस सेवा चालवण्यास दिली. परंतु कर्मचाऱ्यांनी पगारासाठी धरणे धरले तर ठेकेदार बससेवा सुरू करू शकलेला नाही.
आमदार सरनाईक व आमदार गीता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांचे ठेकेदाराशी संगनमत असल्याने ठेका रद्द करून पालिकेने बससेवा सुरू केली नाही. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने ठेका रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
सत्ताधारी भाजपाची काही मंडळीच ठेकेदाराच्या फायद्यासाठी धावपळ करत असून महासभेत देखील त्यांनी ठेकेदारांची पाठराखण केली असल्याचे सरनाईक म्हणाले. महापौर ज्योत्सना हसनाळे ह्यांनी देखील आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपायुक्त अजित मुठे, नगरसेवक सचिन म्हात्रे, ठेकेदार मनोहर सकपाळ यांच्या सोबत भेट घेतली. महापौरांनी देखील, ठेकेदार व प्रशासनाने तातडीने तोडगा काढून नागरिकांसाठी परिवहन सेवा सुरु करा अन्यथा मला माझा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.