पत्नीच्या उपमहापौरपदासाठी जिल्हाध्यक्षांचे षड्यंत्र, नगरसेवकांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 01:01 AM2020-01-25T01:01:44+5:302020-01-25T01:02:19+5:30
काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी षड्यंत्र केले आहे. तसेच माझी गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे
डोंबिवली : काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी षड्यंत्र केले आहे. तसेच माझी गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे, असे भासवून सगळ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी पोटे यांच्यावर केला. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पत्रामध्येही तसा कुठेही उल्लेख नसल्याचे ते म्हणाले.
कल्याण येथे महापालिकेत पक्ष गटनेत्यांच्या कार्यालयात म्हात्रे यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यावेळी नगरसेविका हर्षदा भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार, माजी नगरसेवक नवीन सिंग आदी उपस्थित होते. दर्शना भोईर यांची इच्छा नसतानाही वरिष्ठांकडून त्यांच्या नावे गटनेतेपद स्वीकारण्याचे पत्र पोटे यांनी आणले. खरेतर, त्यासंदर्भात सदाशिव शेलार यांनी आधीच वरिष्ठांना पत्र देत या निर्णयासंदर्भात तूर्तास स्थगिती देण्याचे पत्र आणले होते, असेही म्हात्रे यांनी पत्रकात म्हटले आहे.
स्थायी सभापती निवडीवरून जो गोंधळ निर्माण झाला आहे, त्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्षांची वेळ मागितली आहे. आम्ही त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडणार आहोत, असे म्हात्रे म्हणाले. सिंग यांनी मात्र पुन्हा पोटे यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावे आणि त्या जागी सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला संधी द्यावी. डोंबिवलीकरांना ती संधी दिल्यास निश्चितच केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये वेगळे चित्र दिसून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माझी पत्नी व नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी मी षड्यंत्र केले, हा आरोप बिनबुडाचा आहे. त्याकडे मी लक्ष देत नाही. पण, महाविकास आघाडीला मतदान न करता भाजपला साथ देणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली आहे, ती योग्य आहे. त्यामुळे मी दिशाभूल केली, ही टीका करणे उचित नाही. मला जर उपमहापौर करायचे असते, तर मी गटनेतेच केले असते. अजून कशात काही नाही आणि आरोप सुरू झाले आहेत, ते योग्य नाही.
- सचिन पोटे, कल्याण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस