ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे संपादित केलेले आक्षेपार्ह छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या अनंत करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले नसल्याचा आरोप पोलिसांनी दोषारोपपत्रात केला आहे. तसेच त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. करमुसे याचे ट्विट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केल्याचे आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, करमुसे सदस्य असलेल्या संघटनेतील एका सदस्याने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
करमुसे याने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या आव्हाड यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह छायाचित्रप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात १३ सप्टेंबरला पोलिसांनी दाखल केले. करमुसे याच्या जप्त केलेल्या फोनमध्ये आव्हाड यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सापडले होते. तरीही त्याने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे. यापूर्वी करमुसेनेच दाखल केलेल्या याचिकेवरील निकालात उच्च न्यायालयाने करमुसेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आपल्याविरोधात विकृत ट्विट्सबद्दल गुन्हा दाखल असल्याची बाब तसेच आपले विकृत ट्विट्स याची माहिती याचिका दाखल करताना उच्च न्यायालयापासून लपवून ठेवल्याबाबतही न्यायालयाने स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
आव्हाडांच्या घराची केली होती रेकी करमुसे अध्यक्ष असलेल्या संघटनेतील सदस्य अविनाश पवार याने आव्हाड यांच्या घराची रेकी केली होती. त्याच संघटनेच्या शाश्वत नामक व्यक्तीने ट्विटर हँडलरवरून आव्हाड यांना ‘काही मंडळी तुमची वाट पाहत आहेत. बाहेर निघू नका’, अशी धमकी दिली होती. पाेलीस तपासात आव्हाड यांच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच पवार याला अटक झाली हाेती.