कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण, निपुंगेंची आता उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:07 PM2017-10-03T20:07:15+5:302017-10-03T20:09:54+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांनी आता मुंबई उच्च न्यायायालत धाव घेतली आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांनी आता मुंबई उच्च न्यायायालत धाव घेतली आहे. आपल्याला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निपुंगेंचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी अलिकडेच फेटाळला. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल, अशी शक्यता पोलीस वर्तुळात वर्तविण्यात येत होती. जुलै २०१७ पासून त्यांनी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा हिचा केलेला छळ, तिला केलेले वारंवार फोन अशा सर्व बाबी विचारात घेऊन ठाणे न्यायालयाने त्यांचा हा अटकपूर्व जामीन फेटाळला. मात्र,या प्रकरणाशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसून तपास पथकाला सर्वप्रकारे सहकार्य करण्याची पूर्ण तयारी असल्याचे कारण देऊन मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. मंगळवारी याच प्रकरणाच्या कागदपत्रांची तसेच तपास अहवालाची मागणी उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांकडे केली. त्यानुसार तपास पथकाने याबाबतची सर्व माहिती उच्च न्यायालयाकडे सादर केली असून लवकरच याबाबतच्या सुनावणीची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य एक सहआरोपी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल तथा सुभद्राचा भावी पती अमोल फापाळे याला २२ दिवसांच्या चौकशीअंती २७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली. तर गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे ६ सप्टेंबरपासून एसीपी निपुंगे हे मात्र वैद्यकीय कारण देऊन दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांच्या नाशिक आणि पुण्याच्या घरीही पोलीसांची दोन पथके गेली होती. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा अद्याप लागलेला नसून त्यांचा फोनही नॉटरिचेबल येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.