मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यरत हवालदाराची लेक श्वेता गौतम तोत्रे हिने रशियातून एमबीबीएस विथ एमडी फिजिशियन पदवी प्राप्त केली . कोरोना व रशिया - युक्रेन युद्ध अश्या परिस्थितीत देखील अभ्यासावरचे लक्ष विचलित होऊ न देता तिने गुणवत्ता यादीत ८० टक्के गुण मिळवल्या बद्दल तिचे पोलीस दलासह विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे.
गौतम तोत्रे हे सध्या भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत . पोलीस दलात त्यांची ३० वर्षांची सेवा झाली आहे . मूळचे ते पुण्याच्या खेड राजगुरूनगर तालुक्यातील वडगाव पाटोळे गावचे आहेत . तोत्रे यांची मुलगी श्वेता हिला डॉक्टर व्हायचे होते . कुटुंबाने देखील तिच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
रशियाच्या कालीनीनग्राड भागातील इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी मध्ये तिने प्रवेश घेतला होता . परंतु सुरवातीला कोरोनाचे संकट आणि नंतर युक्रेन - रशिया युद्धा मुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाले . परंतु त्या तेलात देखील श्वेता हिने प्रॅक्टिकल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आपले ध्येय साध्य केले . नुकताच रशियात पदवीदान समारंभ पार पडल्या नंतर ती मायदेशी परतली . नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांनी तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.