ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस काँग्रेसच्या ४७ पैकी ४२ नगरसेवकांनी विरोध करून त्यांच्याऐवजी शिवसेनेत असलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने तिकीट द्यावे, अशी मागणी केली आहे.ठाण्यात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नगरसेवकांनी टावरे यांच्यासाठी काम न करण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी खासदार असतानासुद्धा टावरेंनी काँग्रेसविरोधात काम केले असल्याचा आरोप नगरसेवक इम्रानवल्ली मोहम्मद खान यांनी केला. या वेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे गटनेते, सभागृह नेते आदींसह इतर ३५ नगरसेवक उपस्थित होते.टावरे यांनी महापौर निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केली होती, तसेच त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही काम पक्षासाठी केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या त्यांच्यावर ग्रामीण भिवंडीची जबाबदारी सोपवली आहे. परंतु, ग्रामीण भागातही काँग्रेसला वाढवण्यात ते अपयशी ठरले असल्याचा ठपकाठेवण्यात आला. त्यामुळे त्यांना तिकीट दिल्यास काँग्रेसचा पराभव अटळ असल्याचे पत्र पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच ४२ नगरसेवकांनी दिल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.टावरे यांच्याऐवजी शिवसेनेचे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. म्हात्रे यांची श्रेष्ठींशी भेटसुद्धा घडवून आणली होती. परंतु, एवढे करूनही पक्षाने विजयी होणाऱ्या उमेदवाराला डावलून टावरे यांच्या नावाचा विचार केला आहे. त्यामुळे टावरे यांच्याविरोधात काम करू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच वेळ पडल्यास सर्व पदांचा राजीनामा देऊ, असेही या नगरसेवकांनी स्पष्ट केले. दुसरीकडे टावरे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते तथा कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीसुद्धा पडघा येथे सभा घेऊन वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील काही लोकांच्या स्वार्थामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात आहे. भिवंडी काँग्रेसने टावरेंना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या ठरावावेळी हे नगरसेवक कुठे होते? सुरेश म्हात्रे हे जिल्हा परिषदेत सभापती असून काँग्रेसचे साधे सदस्यही नाहीत. त्यामुळे या नगरसेवकांना सुरेश म्हात्रेंचा पुळका का आला आहे? ठाण्यातील या पत्रकार परिषदेला ४२ नव्हे, तर केवळ १५ नगरसेवक उपस्थित होते.- जावेद दळवी, महापौर, भिवंडीमाझी उमेदवारी मी जाहीर केली नसून पक्षश्रेठींनी ती जाहीर केली आहे. भिवंडीत काँग्रेस ही निवडून येणारी जागा असून त्यांचा मला विरोध का आहे, हे माहीत नाही. मात्र, या नगरसेवकांचा बोलविता धनी विरोधकांमध्येच आहे, असा माझा संशय आहे. सुरेश म्हात्रे यांचा काँग्रेस पक्षाशी संबंधच काय की, ज्यांच्यासाठी हे नगरसेवक पुढाकार घेत आहेत.- सुरेश टावरे, माजी खासदार आणि लोकसभा उमेदवार, काँग्रेस