'महिलांसाठी मतदारसंघ आरक्षित हवा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:08 AM2019-09-27T00:08:16+5:302019-09-27T00:08:34+5:30
शिवसेना आणि काँग्रेसमधील महिलांची मागणी; ठाण्यातून अद्याप संधी मिळालेली नाही
ठाणे : ठाणे लोकसभेतील एक विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित असावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी ठाण्यातील शिवसेनेच्या तसेच काँग्रेसच्या महिलासुद्धा आग्रही झाल्या आहेत. मागील काही निवडणुकांंचा विचार केल्यास ठाणे विधानसभा मतदारसंघातून महिलेला संधी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेत जसे ५० टक्के आरक्षण मिळते, त्याच धर्तीवर चारपैकी एक मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करण्यात यावा, अशी मागणी या महिलांनी लावून धरली आहे.
महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण मिळूनही ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मात्र केवळ दोन महिला आमदार असून, विशेष म्हणजे शिवसेनेकडून आमदार होऊन गेलेल्या मनीषा निमकर आणि काँग्रेसकडून १९७२ साली काँग्रेसकडून विमल रांगणेकर या दोन महिला आमदारांचा अपवाद वगळता एकही महिला आमदार विभाजनानंतर ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेली नाही. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘प्रथम ती’ या महिला संमेलनाच्या माध्यमातून आता ठाण्यात महिला आघाडीची राजकीय इच्छाशक्ती अधिक प्रबळ झाली असून निदान ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने लावून धरली आहे. यामध्ये विशेषकरून ओवळा-माजिवडा विधानसभेवर महिलांनी जोर दिला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील, त्यानुसारच पुढचे धोरण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्ते प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महापौर मिनाक्षी शिंदे या ‘प्रथम ती’ संमेलनात हजर होत्या.
ठाण्यात सुरु वातीपासून शिवसेनेची सत्ता आहे. यामध्ये महिला नगरसेवकांची संख्या मोठी आहे. मात्र, मनीषा निमकर यांचा अपवाद वगळता शिवसेना पक्षाकडून अद्याप एकाही महिलेला आमदारकीसाठी तिकीट मिळू शकलेले नाही. आता ठाणे लोकसभेतील सहापैकी किमान एक मतदारसंघ महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. महिलांना नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शिवसेनेत पक्षप्रमुखाचा आदेश अंतिम मानला जातो. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, त्यानंतरच पुढची दिशा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे, काँग्रेसच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेसाठी एखादा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी बुधवारी केली होती. त्यापाठोपाठ आता महिला आघाडीही सक्रिय झाली आहे.
ओवळा-माजिवडासाठी हट्ट
ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे. मात्र, त्यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी यापूर्वीच
मोर्चा उघडला आहे.
आता त्यात महिला आघाडीनेही उडी घेतली असून हाच मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.त्या आशयाचे पत्रही त्यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, ठाणे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा, असेही या पत्रात नमूद केल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघानिमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसत आहे.