कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक ते कल्याण पूर्व लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल हा धोकादायक झाल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल नव्याने कोणी बांधायचा यावर एकमत होत नसल्याने तिढा कायम आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेची रेल्वे प्रशासनासोबत बुधवारी बैठक होणार आहे.
कल्याण पूर्वेतील लोकग्रामला जाण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल होता. मुंबईतील पादचारी पूल कोसळण्याच्या घटनांनंतर रेल्वेने २९ पादचारी पुलांचे लेखा परीक्षण केले होते. त्यानुसार लोकग्राम पादचारी पूल हा धोकादायक झाल्याने तो बंद करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या. मे महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल बंद करण्यात आला. पूल बंद करण्याचे आदेश रेल्वेने महापालिकेस दिले तेव्हा रेल्वेकडे पुलाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ३८ लाख रुपये भरा, असेही फर्मान रेल्वेने सोडले होते. हा पूल १९९१ मध्ये बांधण्यात आला होता. पुलाची दुरुस्ती होईपर्यंत नागरिकांच्या रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था महापालिकेने करावी, असे रेल्वेने सांगितले होते. महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकग्राम हा पादचारी पूल नव्याने उभारण्याचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पात प्रस्तावित आहे. त्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे चर्चा केली आहे. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही रेल्वेकडून त्यासाठी संमती दिली गेलेली नाही. महापालिकेने पुलाच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी ७४ लाख ६८ हजार रुपये रेल्वेला यापूर्वी दिले आहेत.
रेल्वेने या पैशातून पुलाची कुठे व काय देखभाल-दुरुस्ती केली याचे प्रमाणपत्र रेल्वेने महापालिकेला दिलेले नाही. पूल रहदारीसाठी बंद ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्याला रेल्वे जबाबदार राहील असे आयुक्तांनी रेल्वेला सुनावले आहे.पादचारी पूल रहदारीसाठी बंद असल्याने पादचाऱ्यांची चार महिन्यांपासून परवड सुरू आहे. पादचाºयांना रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ ला कर्जतच्या दिशेने असलेल्या स्कायवॉकवरून सिद्धार्थनगर येथे जाऊन मग लोकग्रामकडे वळसा घालून जावे लागत आहे किंवा कल्याण पश्चिमेतून रिक्षाने पत्रीपुलाला वळसा घालून वाहतूककोंडीचे अडथळे पार करत लोकग्राम गाठावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावर उद्या मुंबईतील रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती उद्या होणार आहे.काय आहे नेमकी अडचण?लोकग्रामच्या नव्या पादचारी पुलासाठी रेल्वेने महापालिकेकडे ८० कोटींची मागणी केली होती. त्यासाठी ८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेने फलाट क्रमांक एक ते लोकग्राम असा पूल बांधण्याचे प्रस्तावित केले.महापालिकेच्या मते फलाट क्रमांक सात ते लोकग्राम इतकाच पोर्शनचा पादचारी पूल बांधण्यासाठी किमान ३० कोटींचा खर्च अपेक्षित असताना ८० कोटी रेल्वेला का द्यायचे, असा मुद्दा महापालिकेने उपस्थित केला आहे. महापालिकेच्या मते कर्जत दिशेने असलेला स्कायवॉकचा एक उतार फलाट क्रमांक ७ ते सिद्धार्थनगरपर्यंत देण्यासाठी १८ कोटींचा खर्च झाला होता.400मीटर लांबीच्या लोकग्रामच्या नव्या पादचारी पूलासाठी ८० कोटी महापालिकेने का मोजायचे, असाही प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वेकडून हा पादचारी पूल महापालिकेनेच बांधावा अशी भूमिका घेतली आहे. नेमका याच मुद्यावर उद्याच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.