डोंबिवली - कल्याण दिशेकडील धोकादायक पुलाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करावे अन्यथा भिक मांगो आंदोलन करण्यात येइल अशा असा इशारा शहरातील सामाजिक संस्थांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला आहे.पूलाची धोकादायक स्थिती झाल्याने हा पूल प्रवाशांसाठी एप्रिल महिन्यात बंद करण्यात आला होता. त्याचा काही भाग पाडण्यात आला असून अन्य काम कूर्म गतीने पुढे जात आहे. त्यामुळे स्थानकातील अन्य दोन पादचारी पूलांवर प्रवाशांचे लोंढे वाढत असून त्यातून कोणतीही दुर्घटना होऊ शकते, याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि तात्काळ पूलाचे काम पूर्ण करुन प्रवाशांसाठी तो खुला करावा अशी मागणी शिवनलिनी प्रतिष्ठान व जनहित प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. त्यासंदर्भात बुधवारी डोंबिवली स्थानक प्रबंधकांना निवेदन देण्यात आले.परेल सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी पुलाच्या बांधणीचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतांना शिवनलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी, जनहित प्रतिष्ठानचे महेश काळे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थि होते. त्या सगळयांनी रेल्वे अधिकार्यांशी चर्चा केली. त्यावेळी स्थानक प्रबंधक के.ओ. अब्राहम यांनी सांगितले की, तो पूल धोकादायक झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तो पूल प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ते काम रेल्वेच्या अभियंता विभागांतर्गत येत असून त्याचे नियोजन करण्यात येत असून आणखी पाच महिने तरी त्यासाठी लागणार आहेत. आम्ही देखील यासाठी पाठपुरावा करीत असून लवकर काम व्हावे असे वरिष्ठांना कळवले असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे आंदोलन होईल की नाही हे आताच सांगता येणार नसल्याचीही चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती.
डोंबिवली स्टेशनवरील पादचारी पुलाच्या बांधकामास लागणार पाच महिने, सामाजिक संस्थांकडून आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 2:58 PM