अंबरनाथ: अंबरनाथच्या नवरेनगर परिसरातील हिमगिरी सोसायटीच्या पुनर्विकासावरून वाद निर्माण झाला आहे. या सोसायटीचा विकास करताना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने सात मजल्यांची परवानगी असताना थेट दहा मजले बांधल्याचा आरोप नवरेनगर को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी फेडरेशनने केला आहे, तर फेडरेशनचे हे आरोप बांधकाम व्यावसायिकाने फेटाळले आहेत.
अंबरनाथ पूर्व भागात ९०च्या दशकामध्ये नवरेनगर हे भव्य गृहसंकुल उभारण्यात आले. त्यात ५०हून अधिक इमारतींचा समावेश असून, तब्बल ७५० सदनिका सदनिका आहेत. या सोसायटींपैकी बहुसंख्य इमारती धोकादायक झाल्या आहेत. सोसायटीतील इमारत क्रमांक ३२ ते ३४ या तीन इमारतींची एकत्रित सोसायटी असलेल्या हिमगिरी को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीने तेलंग बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या सोबत करार करून इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे. या पुनर्विकासाला नवरेनगर को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी फेडरेशनने हरकत घेतली आहे. सोसायटीच्या पुनर्विकासासाठी नगरपालिकेने सात मजली इमारतीसाठी परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी दहा मजली इमारत बांधण्यात आल्याचा आरोप फेडरेशनचे अध्यक्ष मिलिंद गान यांनी केला आहे. याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने केवळ काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर कोणतीही कारवाई बांधकाम व्यावसायिकावर झालेली नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर फेडरेशनने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दुसरीकडे सोसायटीचा पुनर्विकास करणारे बांधकाम व्यावसायिक संदीप तेलंगे यांनी मिलिंद गान यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नव्हे तर इमारतीला दहा मजल्यांची परवानगी मिळण्यासंदर्भात प्रस्ताव पालिकेकडे या आधीच सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहा मजली इमारतीसाठी जी फायर एनओसी लागते तीदेखील मिळाली आल्याचे तेलंगे यांनी स्पष्ट केले.