अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक नाले अरूंद करून त्या ठिकाणी मातीचा भराव करत वाढीव बांधकामे केली आहेत. कल्याण-बदलापूर रस्त्याला लागून असलेला समांतर नाला हा ४० फुटावरून अवघ्या १५ फुटाचा झाला आहे. त्यामुळे मागच्याबाजूला पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
नगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका आता शहरवासियांना बसत आहे. शहरातील मुख्य नाले रूंद करण्याऐवजी आहे त्या नाल्यांचे संरक्षण करण्यात पालिका कमी पडत आहे. त्यामुळे पावसात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढत आहे. कल्याण-बदलापूर मार्गावरील मोठा नाला हा ३० ते ४० फूट रूंद होता. मात्र या नाल्याशेजारी असलेल्या कंपन्यांनी तो नाला अरूंद केला. काही ठिकाणी मातीचा भराव केला. त्यातील काही भागात नाला थेट वळविण्याचे काम करण्यात आले आहे. तर पोलीस ठाणे ते महात्मा गांधी विद्यालयापर्यंतचा नाला हा दुकानदारांनी वाढीव बांधकाम करून अरूंद केला आहे. तर काही दुकानदारांनी थेट भिंत उभारून नाल्यात अतिक्रमण केले आहे. सुमारे १० ते १५ नाले या दुकानदारांनी व्यापले आहेत. त्यामुळे समांतर रस्त्याचा नाला हा अरूंद झाला आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग अरूंद झाला आहे. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ समोरील नाल्याचीही हीच अवस्था झाली आहे. त्या ठिकाणीही भराव करून नाला अरूंद केला आहे. हाच प्रकार भास्करनगर भागात आणि संजयनगर भागात देखील झाला आहे. मोरीवली गावाला लागून असलेल्या नाल्याशेजारीही भराव टाकून नाला अरूंद केला आहे. या नाल्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे.येथे झाले सर्वाधिक अतिक्रमणकल्याण-बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या नाल्यावर सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. १० ते १५ फुटांचे दुकान आज नाल्यात अतिक्रमण करुन थेट ३० ते ४० फूट रूंद करण्यात आले आहे. ४० फुटांचा नाला हा १५ फुटांचा झाला आहे तर १५ फुटांचे दुकान आज ४० फुटांचे झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असतानाही पालिका प्रशासन नाल्यावरील बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहे.