बोर्डी - राज्यातील अनेक भागांत तसेच पालघर जिल्ह्यात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. दरम्यान, लगतच्या गुजरात राज्यात हेच दर नऊ रुपयांनी कमी असल्याने सीमाभागातील ग्राहकांनी गुजरातची वाट धरली आहे. यामुळे करोना संक्रमणाचा धोका वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Consumers in border areas turn to Gujarat due to petrol price hike, fear of corona transition)
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार गेल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. डहाणू आणि तलासरी हे तालुके गुजरात राज्याच्या सीमेवर वसले आहेत. गुजरातला पेट्रोलचे दर हे पालघर जिल्ह्यातील दरापेक्षा नऊ रुपायांनी कमी आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील वाहनचालक लगतच्या राज्याच्या उंबरगाव शहरातील पेट्रोल पंपांवर जातात. या दोन्हीकडील दरात नेहमीच हा फरक असतो. किंबहुना त्याचाच फायदा घेत उंबरगाव येथील पेट्रोल पंपचालकांनी महाराष्ट्राच्या झाई गावच्या दीड-दोन किमी अंतरावर पंप सुरू केले आहेत. आगामी काळात पंपांची संख्या वाढण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
सीमाभागातील वाहनचालकांना केवळ गुजरात राज्याचा एकमेव पर्याय नाही. तर दमण आणि सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातही पेट्रोलचे भाव कमी आहेत. दरम्यान, राज्यातील दर शंभरीपार गेल्यानंतर तेथील पंपाचालक डहाणू, तलासरीतील ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील पंपचालकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अन्य राज्यातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीचा मागील ४८ तासांचा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे. मात्र काही रुपयांसाठी येथील वाहनचालक कायद्याला बगल देत, आर्थिक फायदा पाहात आहेत. त्यामुळे कोविड संक्रमणाची शक्यता असल्याने प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.